प्रतिबंधित क्षेत्राबाहेर 9 दिवसांत 37% नवे रुग्ण
लॉकडाऊन शिथिलता करोनाला ठरतेय पोषक
पुणे – पहिल्या तीनही लॉकडाऊनमध्ये शहराच्या प्रतिबंधित क्षेत्रांपुरता मर्यादित असलेला करोना आता या क्षेत्राबाहेर वेगाने पसरत आहे. तिसरे लॉकडाऊन संपल्यानंतर (दि.18) शहरात नवीन 1,703 रुग्ण आढळले असून, त्यात सुमारे 1,070 रुग्ण ( 63 टक्के) प्रतिबंधित क्षेत्रातील, तर 633 (37 टक्के) रुग्ण त्या क्षेत्राबाहेरचे आहेत. लॉकडाऊन शिथिल होताच वाढलेली वर्दळ आणि बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने आता करोनाचे नवे “हॉटस्पॉट’ तयार होत आहेत.
पहिले लॉकडाऊन 17 एप्रिल रोजी संपले. त्यानंतर दुसरे लॉकडाऊन 3 मेपर्यंत होते. या कालवधीतही कडक निर्बंध होते. मात्र, तिसरे लॉकडाऊन दि. 3 मे रोजी सुरू झाल्यानंतर केंद्रशासनाने त्यात थोडी शिथिलता आणली. त्यामुळे शहरातही मर्यादित व्यवसाय सुरू करण्यास मुभा दिली. त्यावेळी महापालिकेने शहरात सर्वाधिक करोना रुग्ण असलेले 69 भाग कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर केले. त्यावेळी दि. 3 ते 17 मे या कालावधीत शहरात एकूण 1,664 रुग्ण आढळले होते. त्यात प्रतिबंधित क्षेत्रातील-1242, तर त्या क्षेत्राबाहेरील 422 रुग्ण होते. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही करोनाचा प्रसार प्रतिबंधित आसपासच्या परिसरात होत असल्याचे समोर आले.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये महापालिकेने दि. 18 मे रोजी शहरातील प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेऊन जुनी 24 क्षेत्र वगळली, तर 20 नवीन क्षेत्र वाढली. या लॉकडाऊनवेळी मात्र प्रशासनाने जवळपास सर्वच व्यवसायावरील निर्बंध कमी केले. तसेच शहरातील रस्त्यावरही वाहतुकीस मुभा दिली. त्यामुळे गेल्या 8 ते 9 दिवसांपासून शहरात मोठी वर्दळ वाढली आहे. त्यातच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकही गुपचूपपणे या परिसरातून बाहेर पडत आहेत. परिणामी, इतर भागांत करोनाचा प्रसार झपाट्याने वाढला असून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील रुग्णवाढ एकूण रुग्णांच्या तुलनेत 37 टक्क्यांवर गेली आहे.