पुणे – शहरातील शनिवारची बाधित संख्या 211 इतकी असून, दिवसभरात 302 जण करोनामुक्त झाले. शनिवारचा पॉझिटिव्हिटी रेट आठवड्यातील सर्वांत कमी म्हणजे 3.57 इतका राहिला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत करोनामुळे 17 जणांच्या मृत्युची नोंद झाली असून, त्यामध्ये शहर हद्दीतील 8 जणांचा समावेश आहे.
मागील चार दिवसांपासून शहरातील बाधित संख्या 270 ते 296 च्या आसपास होती. त्यामुळे बाधित दर पाच टक्क्यांपर्यंत गेला. मात्र, आज पुन्हा बाधित दर साडेतीन टक्क्यांवर आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
शहरात सध्या सक्रीय बाधित संख्या 2 हजार 559 इतकी आहे. त्यातील 387 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 585 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. शहरात आज 5 हजार 724 जणांची नमुने तपासणी करण्यात आली.
तर आतापर्यंत 26 लाख 10 हजार 412 जणांच्या नमुने तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 4 लाख 75 हजार 588 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील 4 लाख 64 हजार 505 जण करोनामुक्त झाले असून, 8 हजार 524 बाधितांचा मृत्यु झाला आहे.