करोनाचा मृत्युदर पुण्यात रोखला

5 टक्‍क्‍यांवरून 3 टक्‍क्‍यांपर्यंत प्रमाण आले खाली

सुनील राऊत
पुणे – शहरात करोनाच्या बाधितांचा आकडा वाढत असतानाच; करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण 3 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. जूनच्या सुरुवातीला हा दर 5 टक्‍के होता. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे हे प्रमाण आता 3.12 टक्‍क्‍यांवर आले आहे.

शहरात जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून करोना नवीन बाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यातच लॉकडाऊन शिथिल होतानाच शहरात करोनाची लाट येण्याचा धोका केंद्रीय पथकाने वर्तवला होता. करोना बाधितांवर विविध माध्यमांतून उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, जूनमध्ये शहरातील मृत्युदर 3.12 टक्‍केपर्यंत कमी करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. मे अखेरीस हे प्रमाण 5 टक्‍के होते. त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला तो 4.50 टक्‍क्‍यांपर्यंत घटला होता.
करोनामुक्‍तीचे प्रमाणही राज्यापेक्षा जास्त
पुण्यात करोना मृत्यूदर घटण्यासह करोनामुक्‍तांचा टक्‍काही पुन्हा वाढला आहे. तो राज्याच्या टक्‍केवारीपेक्षा अधिक आहे. राज्यात करोनामुक्‍तीचे प्रमाण 55.19 टक्‍के आहे. तर, पुण्यात हेच प्रमाण 61.89 टक्‍के आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात हे प्रमाण 57 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला होता. मात्र, मागील आठवड्यात हा आलेख उंचावला आहे. तर मुंबईतही हे प्रमाण 67 टक्‍के आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.