करोनाचा मोर्चा झोपडपट्ट्यांकडे

पुणे – गेल्या दीड महिन्यांपासून सोसायट्या आणि इमारतींत पाय पसरणाऱ्या करोनाने आपला मोर्चा पुन्हा झोपडपट्ट्यांकडे वळवला आहे. जनता वसाहत, रामनगर, भवानीपेठ, कासेवाडी, पाटील इस्टेट परिसरांत पुन्हा बाधित सापडण्यास सुरूवात झाली आहे. येथे रुग्णवाढ सुरू झाल्यास अडचणींत वाढ होणार आहे.

मागील वर्षी मार्च ते ऑक्‍टोबरदरम्यान सर्वाधिक करोनाबाधित सापडले होते. त्यावेळी सक्रीय बाधितांचा आकडा 17 हजारांपर्यंत गेला होता. त्यानंतर ही साथ ओसरणे सुरू झाले. त्यावेळी सोसायटयांनी सुरक्षा नियम पाळून संसर्ग रोखला होता. मात्र, आता उलटे चित्र आहे.

सक्रीय बाधितांचा आकडा 24 हजारांवर गेला असून, सर्वाधिक बाधित सोसायट्यांत आहेत. तुलनेने झोपडपट्ट्यांत हे प्रमाण दिवसाला 1 ते 2 बाधितांचे असले, तरी या भागात खबरदारीच्या उपाय योजना सुरू झाल्या असून, साथीला रोखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची धडपड सुरू आहे.

तर स्थिती हाताबाहेर……
शहरातील सक्रीय बाधितांमध्ये सुमारे 70 टक्के रुग्ण सौम्य लक्षणे असल्याने घरीच विलगीकरणात आहेत. त्याच वेळी झोपडपट्टीत लहान घरांमध्ये जास्त लोक असल्याने त्यात बाधितांना सौम्य लक्षणे असले, तरी त्यांना घरी ठेवल्यास करोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची भीती आहे. त्यामुळे या भागांत साथ वाढल्यास महापालिकेस हजारो बेडची क्षमता असलेली कोविड केअर सेंटर सुरू करावी लागण्याची भीती आहे.

कंटेन्मेंट झोनचा आकडा 187 वर, आता परिसरातही निर्बंध
शहरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या लक्षणीय वाढत असून, मंगळवारअखेर या क्षेत्रांचा आकडा 187 झाला आहे. त्यात, बहुतांश प्रमाणात सोसायट्या आणि इमारतींचा समावेश असला, तरी आता संबंधित परिसरही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जात आहे. त्यात महर्षिनगर, मुकुंदनगर, आयसर-पाषाण रस्ता अशा परिसरांचा समावेश आहे. सध्या एकाच कुटूंबातील अनेक जण करोनाबाधित सापडत असल्याने चिंता वाढली आहे.

तसेच अहवाल येईपर्यंत अनेक संशयित घरात न थांबता दैनंदिन कामे करत फिरत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस हा आकडा वाढतच असून, एकाच इमारतील 5 पेक्षा अधिक बाधित आढळल्यास तसेच सोसायटीत 20 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास त्या सील केल्या जात आहेत. मागील आठवड्यात अशा क्षेत्रांची संख्या 150 वर गेली होती. त्यात अवघ्या दोन दिवसांत सुमारे 27 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची वाढ झाली आहे. आता काही भागांत बैठ्या घरांमध्ये तसेच आसपासच्या परिसरात नव्या बाधितांचा आकडा वाढत असल्याने संपूर्ण परिसरच सील केला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.