पोलिसांच्या बिनतारी संदेश विभागात करोनाचा शिरकाव

दोन अधिकाऱ्यांसह 23 जणांना संसर्ग

पुणे – पोलिसांच्या बिनतारी (वायरलेस) संदेश विभागातील मुख्यालयात करोनाने शिरकाव केला आहे. येते आतापर्यंत दोन अधिकाऱ्यांसह 23 कर्मचाऱ्यांना संसर्ग झाली आहे. यातील दोघांवर किवळे, तर इतरांवर बालेवाडी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुणे पोलीस दलात आजवर तिघांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

या कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह येताच, खबरदारीचा उपाय म्हणून संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. संपूर्ण मुख्यालय सॅनिटाइझ करण्यात आले आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत मुख्यालयातील काही विभाग बंद ठेवण्यात आले असून, शक्‍य असेल त्यांना “वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगितले आहे.

राज्यातील पोलीस प्रशासनाच्या बिनतारी विभागाचे कामकाज पाषाण परिसरातील मुख्यालयातून चालते. येथे दैनंदिन कामासाठी 150 पेक्षा अधिकारी व कर्मचारी नियमित मुख्यालयात हजेरी लावतात. करोना रोखण्यासाठी येथे सुरूवातीपासून काळजी घेतली जात होती. मात्र, नेमका येथे शिरकाव कसा झाला हे आम्हाला देखील कळले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिनतारी संदेश मुख्यालयातील 23 कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. संपूर्ण कार्यालयाचे निर्जंतूकीकरण करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत मुख्यालयातील काही कार्यालये बंद असतील. येथे सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.
– चंद्रकांत ढाकणे, पोलीस उपअधीक्षक, बिनतारी संदेश मुख्यालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.