हिंसाचाराच्या आरोपांवर ममता बॅनर्जींचा पलटवार; म्हणाल्या, ‘भाजप नेतेच हिंसेला…’

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकत प्रचंड बहुमतासह सत्ता पुन्हा एकदा काबीज केली. निवडणुकांपूर्वी पक्षाला लागलेली गळती, भाजपने उभं केलेलं आव्हान यांना पुरून उरत ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. निवडणूक प्रचारसभांदरम्यान ‘निकालानंतर ममता बॅनर्जी यांना घरी बसावे लागेल’ असा दावा करणाऱ्या भाजपचे आव्हान राज्यात फुसके ठरले. असं असलं तरी गेल्या निवडणुकांचा विचार करता भाजपने येथे ७७ जागा जिंकत मुसंडी मारली आहे.

दरम्यान, निवडणूक निकालांनंतर राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना उफाळून आल्या आहेत. तृणमूलच्या कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करीत असल्याचा भाजपचा आरोप असून काही कार्यकर्त्यांचा खून व महिलांसोबत बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपतर्फे करण्यात आलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बंगालमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील घेतल्या आहेत.

अशातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणी आपली भूमिका मांडताना हिंसाचाराच्या घटनांसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. त्या म्हणाल्या, “भाजप नेते राज्यात मुक्त संचार करीत असून तेच हिंसेला प्रोत्साहन देताहेत. राज्यात नवे सरकार स्थापन करून २४ तासही उलटले नसताना हे लोक (भाजप नेते) केंद्राला पत्र पाठवतायेत, केंद्रीय पथके व मंत्री  राज्यात येतायेत. खरतर यांना जनतेने निवडणुकांत तृणमूलला दिलेला कौल मान्यच नाही. माझी त्यांना विनंती आहे की जनादेशाचा सन्मान करा.”

भाजपचं राज्यात करोना पसरवतंय

आज राज्यात केंद्राचे एक पथक आले होते. ते आले त्यांनी चहापान केले व ते परत निगुन गेले. सध्या करोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली असतानाही असं होतंय. आता राज्यात मंत्री आले तरी त्यांच्याकडे कोविड आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक असणार आहे. नियम सर्वांसाठी सारखेच असायला हवेत. भाजप नेत्यांच्या सततच्या येण्याजाण्यामुळेच करोनाचा संसर्ग वाढतोय.”

मोफत लसीकरणाबाबत मोदींकडून उत्तर नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी केलेल्या मोफत लसीकरण्याच्या मागणीबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही. जर हे लोक (केंद्र सरकार) २० हजार कोटी खर्चून नवे संसदभवन व पुतळे उभारू शकतात तर लसीकरणावर ३० हजार कोटींचा खर्च का करू शकत नाहीत.

पीएम केअर फंडाचे काय झाले?

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी पीएम केअर फंडावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “पीएम केअर फंडाचे काय झाले? ते देशातील युवापिढीच्या आयुष्याशी का खेळतायेत? भाजपच्या नेत्यांनी राज्यात येऊन इकडे तिकडे भटकण्यापेक्षा कोविद रुग्णालयांना भेटी द्याव्यात. ते करोना संसर्ग वाढवतायेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.