शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना आज दिवसात शिक्रापूर सह परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 14कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज पुन्हा एका कोरोनाबाधित इसमाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली आहे.
शिक्रापूरसह परिसरात असलेल्या सणसवाडी, डिंग्रजवाडी यांसह आदी गावांमध्ये दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना तसेच काही ठिकाणी कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असताना आज दिवसभरात शिक्रापूर येथे 3, सणसवाडीत 6 तर डिंग्रजवाडीत 5असे एकूण 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
यापैकी सणसवाडी, डिंग्रजवाडी येथील सर्व रुग्ण कोरोनाबाधितांच्या संपर्कातील असल्याचे समोर आले आहे. सणसवाडी येथील रहिवाशी असलेल्या आणि रांजणगाव गणपती येथील कंपनीत कामाला असलेल्या एका व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने कंपनीच्या वतीने तपासणी केली असता त्याचा अहवाल 12 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. मात्र पुणे येथे उपचार सुरु असताना आज त्याचा मृत्यू झाला असल्याने सणसवाडीत 2 दिवसात 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. परिसरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील कोरोनाबाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ, शोभा ढमढेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरात ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केला आहे.
आज नव्याने आढळून आलेल्या सर्व कोरोनाबाधितांच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे. मात्र नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत नागरिकांनी व ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी केले आहे.