मुंबई : मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर मोरेश्वर कोळी यांची पत्नी आणि मुलगाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनामुळे झालेल्या त्यांच्या मृत्यूने वरळी विभागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर तीन दिवसांपूर्वीच वरळी कोळीवाड्यात कर्फ्यू लावून परिसर सील करण्यात आला आहे. परिसरात महापालिकेकडून निर्जंतुकीकरण सुरु आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह स्वत: कोळीवाड्यात येऊन नागरिकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन केले होते. इथल्या 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे.
वरळी कोळीवाडा, आदर्श नगरनंतर आता वरळी पोलीस वसाहतीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस कर्मचारी आणि महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी इमारत सील केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. तर पत्नी कस्तुरबा रुग्णालयात असून मुलाला सेव्हन हिल्स तर मुलीला पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारन्टाईन करण्यात आले आहे.