नवी दिल्ली – फ्रान्समधील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या एका टीमने दावा केला आहे की, युरोपमध्ये पहिला करोना रुग्ण जानेवारीमध्ये नव्हे, तर दोन महिने अगोदरच आढळला होता. मात्र, त्यावेळी डॉक्टर या साथआजाराच्या लक्षणांना समजू शकले नाहीत. जर हा दावा खरा ठरला तर सर्व जगाचे लक्ष चीन आणि वुहानवरून हटून फ्रान्सवर केंद्रित होणार. फ्रान्समधील डॉक्टरांनुसार युरोपमधील पहिला रुग्ण 16 नोव्हेंबर 2019 रोजी फ्रान्समधील कोलमार शहरात सापडला होता.
फ्रान्सच्या उत्तर-पूर्व भागातील या शहरात एका रुग्णालयात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फ्ल्यू झालेले अडीच हजारापेक्षा जास्त रुग्ण आले होते. डॉक्टरांनी या सर्व रुग्णांचे एक्स-रे रिपोर्ट तपासले. यातील दोन रुग्णांच्या एक्स-रे मध्ये करोना संक्रमण झाल्याचे आढळले होते. मात्र, त्यावेळी डॉक्टरांना करोना लक्षणांविषयी अंदाज नव्हता. त्यामुळे याची माहिती नोंदवण्यात आली नाही.
कोलमारमधील अल्बर्ट श्वित्जर रुग्णालयाचे डॉ. मायकल श्मिट आणि त्यांच्या टीमने दावा केला आहे की, चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळलाच नसावा. कारण हा संसर्ग नोव्हेंबरपर्यंत युरोपमध्ये आला होता. तर फ्रान्समध्ये पहिला रुग्ण 24 जानेवारी 2020रोजी आढळल्याची नोंद आहे. जगभरात करोनाचा संसर्ग पसरण्याचे कारण चीनमधील वुहान शहराला मानले जाते. चीनने जगाला करोना संसर्गाची माहिती 31 डिसेंबरला दिली होती.