श्रीगोंदा – तालुक्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला असून, श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील एका 32 वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीसाठी ढोकराई फाटा ते श्रीगोंदा रेल्वे गेट हा परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ घोषित करण्यात आला आहे. या भागात अत्यावश्यक सेवांसह सर्वच सुविधा व वाहतूकही 8 जूनपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, या कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना नगर येथे हलविण्यात आले असून, त्यांच्या स्त्रावाची तपासणी केली जाणार आहे.
दोन महिन्यांनंतर श्रीगोंद्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. करोनाबाधित तरुण हा काही दिवसांपूर्वी घोरपडी (जि. पुणे) येथून श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात आपल्या घरी आला होता. त्याला त्रास जाणवू लागल्याने सुरुवातीला काष्टी येथे आरोग्य केंद्रात त्याने उपचार घेतले. त्यानंतर त्यास श्रीगोंदा शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्या तरुणाला नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्या स्त्रावाची तपासणी केली असता, त्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले.
या तरुणाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने सोमवारी (दि.24) सायंकाळी तातडीने हालचाल करीत श्रीगोंदा फॅक्टरी व आसपासचा परिसर पूर्णतः सील केला. तहसीलदार महेंद्र माळी यांनी ढोकराई फाटा ते श्रीगोंदा रेल्वे गेट हा भाग ‘प्रतिबंधात्मक क्षेत्र’ म्हणजेच ‘कंटेन्मेंट झोन’ घोषित केला आहे. या भागात अत्यावश्यक सेवांसह इतर दुकाने चौदा दिवस म्हणजेच 8 जूनपर्यंत बंद केल्याचे माळी यांनी सांगितले. या भागातील सर्वच रस्ते मंगळवारी (दि.26) बांबूचे गेट बांधून पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांची नोडल प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दूध, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू याबाबत नियोजन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्यामार्फत असणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, या करोनाबाधित तरुणाशी 14 व्यक्तींचा संपर्क आल्याचे समोर आले आहे.
या 14 व्यक्तींना नगर येथे हलविण्यात आले असून, या सर्वांची करोना तपासणी केली जाणार आहे. तसेच चिखली येथील करोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या तिघांचेही तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.