पुणे – लॉकडाऊनमुळे अडकलेला पश्चिम बंगाल येथील इंडियन आयडॉल स्पर्धकाला वारजे पोलिसांनी सुरक्षित घरी पोहोचवले. अंजुमन ईस्लाम (वय 22) असे त्याचे नाव आहे. तो मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तो मुंबईत आला होता. परंतु, मुंबईत सर्व काही बंद होते, त्यामुळे या तरुणाची ऑडीशनची प्रक्रिया खोळंबली. या तरुणाची आर्थिक स्थिती नसली तरी त्याला गाण्याची प्रचंड आवड होती. जवळ मोजकेच पैसे असल्याने त्याने वारजे पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या दांगट वस्ती येथील त्याच्या मित्राशी संपर्क केला. त्यानुसार त्याची पुण्यात काही दिवस निवासाची व्यवस्था झाली.
परंतु, लॉकडाऊन कालावधी वाढत गेल्याने अखेर त्याच्या मित्राने त्याला घराबाहेर काढल्याने हा तरुण रस्त्यावर आला. याविषयी वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले की, एके दिवशी नेहमीप्रमृाणे सकाळी मी माझ्या वाहनातून पोलीस ठाण्याला आलो. त्यावेळी एका कोपऱ्यात हा तरुण रडत असल्याचे पाहिले. त्याच्याशी बोलताना सर्व हकीकत समजली. त्याच दिवशी पश्चिम बंगालला रेल्वे असूनही माझ्या पोलीस ठाण्याला कोटा आला नव्हता.
गोपनीय शाखेच्या कर्मचारी संतोष भापकर व सद्दाम तांबोळी आणि एसपीओ राहुल पाटील, प्रतिक काकडे यांना मी तातडीने सूचना केल्या. विशेष शाखेशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे विशेष शाखेने एक सिटची व्यवस्था होईल, असे सांगितले. त्यानुसार त्या तरुणाला रेल्वेस्थानकाकडे रवाना करण्याबाबत सांगितले.