भरगच्च लग्नसमारंभात करोनाचे विघ्न!

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासन सतर्क


कार्यक्रमांवर येणार निर्बंध : मास्क न वापरणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

– राहुल गणगे

पुणे – राज्यात नागपूर, आमरावतीसह पुणे जिल्ह्यात करोना रुग्णांचा आलेख वाढत चालला आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. करोनावर लस उपलब्ध झाली असली तरी करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात लग्नांचा हंगाम सुरू असून लवकरच जत्रा-यात्रा सुरु होणार आहेत.

लग्न समारंभात सध्या सर्व नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे भरगच्च लग्नसमारंभात करोनाला आमंत्रण मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांवर पुन्हा एकदा कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व यंत्रणेला सरकारकडून देण्यात आले आहेत. सध्या सर्व गोष्टी खुल्या झाल्याने लग्न समारंभ व अन्य सर्व कार्यक्रमात करोनाच्या नियमांना गावोगावी हरताळ फासला जात आहे. यामुळेचजिल्हा प्रशासन पुन्हा एकदा लग्न समारंभ,कार्यक्रमांवर निर्बंध घालण्याचा विचार करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.

करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन व प्रत्येक तालुक्‍याचा आढावा घेऊन लग्न समारंभ व कार्यक्रमांवर निर्बंधघालण्याचा विचारात जिल्हा प्रशासन करत आहे. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर सध्या संपूर्ण जग खुले झाले आहे. त्यातच करोनावर लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे गावागावांत मुहूर्तावर सर्वत्र सनई चौघडे वाजू लागले आहेत. करोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करत विवाह धुमधडाक्‍यात पार पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना करोनाचे भय नसल्याचे दिसून येत आहे. लग्न समारंभात गर्दी जमवून करोनाला आमंत्रण दिले जात आहे, त्यामुळे गावागावातील लग्नाची वरात थेट पोलीस ठाण्यात नेल्याच्या घटनाही गावागावांत घडल्या आहेत.

सध्या ग्रामीण भागात करोनाचा पादुर्भाव वाढत आहे. करोनाची दुसरी लाट येत असल्याची वार्ता प्रत्येकाच्या कानी पडत आहे. त्यानुसार आता सुरवात झाल्याचे दिसून येत आहे. तरीही नागरिक लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमांसाठी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाची परवानगी घेतात. कार्यक्रमासाठी 50 पेक्षा जास्त नागरिकांना जमवून. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता विवाह समारंभ करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात आटोक्‍यात आलेला करोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे.

लग्न समारंभ व इतर कार्यक्रमानिमित्त होणारी गर्दी, मास्क न वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणे यामुळेच करोना पसरू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवरच जिल्हाधिकारी, तहसीलदार, स्थानिक प्रशासनाकडून गर्दी टाळण्याबाबत तसेच करोना जनजागृती होताना दिसून येत नाही. त्यामुळे लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमांवर राज्यशासनाने सुरवातीपासूनच कडक निर्बंध घालण्याची गरज गरज होती. परंतु लस उपलब्ध झाल्याने प्रशासनासह सर्वांनीच हात वर केल्याने ही नामुष्की आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक नियमावलीची अंमलबजावणी करावी. तसेच स्थानिक ग्राम प्रशासनाने दखल घेऊन नियमावलीबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे.

लग्न समारंभात करोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. परंतू प्रशासन किंवा गावकऱ्यांनी राजकीय हेतू बाजूला ठेण्याची गरज असते. करोना दक्षता समितीप्रमाणेच पोलीस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम कृती समिती स्थापन करण्याची गरज आहे. यामुळे नियमांची कडक अंमलबजावणी होऊन करोनासह कार्यक्रमांवरही नियंत्रण राहिल. गावागावांत कायदा सुव्यवस्था नांदेल. याबाबत जिल्हा प्रशासनाने गावागावात लक्ष घालण्याची गरज आहे.
– किरण काळे, पोलीस पाटील, निमगाव म्हाळुंगी.

असा बसेल आळा…
करोना काळात तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली गाव कृती समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये एका तलाठ्याकडे अनेक गावे असल्यामुळे या समितीचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे सरपंच किंवा पोलीस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकाची निर्मिती करावी. यामध्ये पोलीस निरीक्षक किंवा बीट अंमलदार तसेच तंटामुक्‍ती अध्यक्ष व सुशिक्षित नागरिकांचा भरारी पथकामध्ये समावेश करावा. त्यामुळे बालविवाह, करोना प्रसार, पोलीस व ग्राम प्रशासनावरील ताण कमी होऊन करोना आटोक्‍यात आणण्यास मदत होणार आहे. याबाबत राज्य, जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज सध्या तरी निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.