मुंबईपेक्षाही ‘या’ शहरात कोरोनाची गंभीर परिस्थिती; संक्रमित रुग्णांची दुप्पटीने नोंद

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्लीमध्ये एकाच दिवशी, मुंबईच्या तुलनेत सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीमध्ये बुधवारी आणि गुरुवारी प्रत्येकी 17 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली. ही संख्या एखाद्या शहरातील सर्वाधिक संख्या आहे. मुंबईमध्ये या आधी 4 एप्रिलला एकाच दिवशी 11,163 नव्या रुग्णाची भर पडली होती.

मुंबईमध्ये गुरुवारी कोरोनाच्या 8,217 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये 49 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही पाच लाख 53 हजार 159 इतकी झाली असून मृतांची एकूण संख्या ही 12,189 वर पोहोचली आहे.

दिल्लीत गुरुवारी 17 हजाराच्या जवळपास कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये 112 जणांना आपला प्राण गमावावा लागला आहे. दिल्लीमध्ये एकूण मृतांची संख्या आता 11,652 इतकी झाली आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी कोरोना संक्रमणाचा दर हा 20 टक्क्यांवर पोहचला आहे, जो आतापर्यंत उच्चतम आहे. बुधवारी हा दर 16 टक्क्यांच्या जवळपास होता.

दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाची एकूण संख्या ही सात लाख 84 हजार 137 इतकी झाली असून 7.18 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दिल्लीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली असून ती 54,309 इतकी झाली आहे. दिल्लीतील रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या गरजेनुसार उपलब्ध आहे असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याच कारण नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.