मुंबई – देशातील कोरोना विषाणूचा एक प्रमुख हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीये. मुंबई येथील वोकार्ड रुग्णालयामध्ये (Wockhardt Hospital) ३ डॉक्टर्स व २६ परिचारिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने हे रुग्णालय तात्पुरते बंद करण्यात आले आहे. वोकार्ड रुग्णालयामध्ये कोरोना विषाणूच्या तेजीने झालेल्या प्रसाराबाबत आता चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
दरम्यान, वोकार्ड रुग्णालय (Wockhardt Hospital) बंद करण्यात आल्याने रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नसून येथे दाखल करण्यात आलेले रुग्ण व परिचारिकांच्या कोरोना चाचण्या दोनदा निगेटिव्ह येईपर्यंत त्यांनाही रुग्णालयामध्येच थांबावे लागणार आहे. येथे दाखल असलेल्या रुग्ण व परिचारिकांच्या जेवणाची सोय रुग्णालयाच्या उपहारगृहामार्फत करण्यात येणार आहे.