नवी दिल्ली – जगभरात पसरलेल्या करोनामुळे जागतिक क्रीडा स्पर्धांना फटका बसलेला आहे. यातून विविध देशांतील स्पर्धा तर स्थगित करण्यात आल्याच असल्या तरीही सर्व काही सुरळीत होऊन स्पर्धांची सुरुवात होण्यासाठी आणखी किमान दोन वर्षे लागतील, असे मत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीने व्यक्त केले आहे.
करोनामुळे यंदाच्या वर्षातील क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक रद्द करावे लागले असून अनेक स्पर्धा लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत. स्पर्धाच होऊ शकत नसल्याने विविध देशांच्या क्रीडा संघटनांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशा स्थितीत पुढील वर्षी होत असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धादेखील आता 2022 साली घेण्यात येण्याचे संकेत संयोजन समितीने दिले आहेत.
ही स्पर्धा तिच्या मूळ वेळापत्रकानुसार होणार होती त्यात बदल करण्यात आला असून अन्य देशांतील काही स्पर्धांच्या तारखा मध्ये येत असल्याने या स्पर्धेच्या तारखांमध्ये एक दिवसाचा बदल करण्यात आला आहे. ही स्पर्धा आता 27 जुलैऐवजी 28 जुलैला सुरू होईल.
जागतिक मैदानी स्पर्धा याच दरम्यान येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर युरोपमधील महिलांची फुटबॉल स्पर्धादेखील राष्ट्रकुल स्पर्धेला अडथळा ठरत होती.
2022 सालच्या राष्ट्रकुल…
स्पर्धेसाठी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहराला यजमानपद देण्यात आले असून आता ही स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधित होणार आहे. ही स्पर्धा परंपरेप्रमाणे 19 क्रीडा प्रकारात होणार असून त्यात काही देशांनी अन्य खेळांचाही समावेश करावा, अशी मागणी केली होती, त्यावरही विचार केला जाणार आहे, असे महासंघाने सांगितले आहे.