पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू झालेली करोनाची लाट आता दक्षिणेकडून पूर्व भागाकडे सरकली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता शहरातील सर्वाधिक बाधित तसेच सक्रीय बाधित हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.
हडपसर हद्दीत एकूण 5,768 बाधित असून त्यात सुमारे 1,127 सक्रीय बाधित आहेत. दोन आठवड्यांपूर्वी दक्षिण पुण्यात या साथीने थैमान घातले होते. सुरुवातीला मध्य शहर, त्यानंतर उत्तरेकडील उपनगरांमध्ये ही साथ वाढली. त्यात, नगररस्ता, येरवडा, विश्रांतवाडी, कळस, धानोरी परिसराचा समावेश होता. नंतर ही साथ शिवाजीनगर, औंध, बाणेर, वारजे भागात पसरली. मागील काही आठवड्यांत सिंहगड रस्ता, धनकवडी, बिबवेवाडी, कात्रज परिसरात करोना बाधितांचे प्रमाण लक्षणीय वाढले.
सर्वाधिक बाधितांत दुसऱ्या क्रमांकावर सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय असून येथे एकूण 4,090 पैकी सुमारे 886 सक्रीय बाधित आहेत. नगररस्ता-वडगावशेरी- एकूण 3,797 पैकी 871 सक्रीय बाधित आहेत. तर सर्वांत कमी बाधित रामटेकडी-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असून या ठिकाणी 2,931पैकी 358 सक्रीय बाधित आहेत.