एका कर्मचाऱ्याला बाधा झाल्याचे निष्पन्न : चिंता वाढली
पुणे – महापौर मुरलीधर मोहोळ हे करोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह संपूर्ण स्टाफची करोना चाचणी करण्यात आली. त्यात सुमारे 20 जण पॉझिटिव्ह सापडले असून, त्यात महापौर बंगल्यातील एक कर्मचाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
महापालिका भवनातील महापौर कार्यालय याशिवाय महापौर बंगल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्यात बंगल्यातील एक कर्मचारी संक्रमित असल्याचे दिसून आले आहे. आता संपूर्ण महापालिकेतील नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी यांच्यासह संक्रमितांचा आकडा आता 200 पार गेला आहे.
दोन दिवसांपूर्वीच मोहोळ यांना ताप आल्याने त्यांनी त्यांची टेस्ट करून घेतली त्यातून ते पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या कुटुंबीयांची टेस्ट केली असता त्यात आठ जणांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला. त्यानंतर महापौर कार्यालयातील आणि बंगल्यातील स्टाफची स्वॅब टेस्ट करण्यात आली.
त्यामध्ये त्यांचे स्वीय सहायक, सुरक्षा रक्षक, शिपाई आणि वाहनचालक यांचा समावेश आहे. या तपासणीनंतर बंगल्यातील एक सेवकाला करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.
उपमहापौरांना करोना झाल्याची अफवा
उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना करोना झाल्याची अफवा पसरल्याने संपूर्ण शहरात हा दिवसभर चर्चेचा विषय ठरला. मात्र, “मला करोनाची लागण झाली नसून, मी ठीक आहे. मी स्वत:ची काळजी घेतच आहे, तुम्हीही स्वत:ची काळजी घ्या,’ असा व्हिडिओ संदेश त्यांनी सोशल मीडियावरून नागरिकांच्या माहितीसाठी प्रसारित केला.
महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाल्याने सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. उपमहापौरांनीही त्यांच्याबरोबर काही बैठका केल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही करोनाची लागण झाल्याची अफवा पसरली आहे. “सोशल मीडियावरून पसरलेला मेसेज पाहून अनेकजण मला फोन करत आहेत. तो करण्याची तसदी घेऊ नका,’ असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी उपमहापौरांच्या पतीला करोना संसर्ग झाला होता. त्यावेळी उपमहापौरांना क्वारंटाइन करण्यात आले होते, तसेच त्यांची टेस्टही घेण्यात आली होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.