बाधितांचा “ट्रेंड’ बदलतोय; याच वयोगटातील चौघांचा मृत्यू
तरुणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज
पुणे – शहरात फोफावणाऱ्या करोनाने आता आपला मोर्चा 20 ते 30 या वयोगटाकडे वळवला आहे. शहरातील एकूण 5,427 बाधितांमध्ये सर्वाधिक 1,102 जण या वयोगटातील आहेत. लॉकडाऊन शिथिलतेनंतर या वयोगटातील बाधितांची संख्या अचानक वाढल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. या वयोगटातील चौघांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
करोनाबाधितांची संख्या दि. 27 मेपर्यंत 5,427 वर गेली आहे. सर्वाधिक बाधित 40 ते 50, 60 वयोगटातील होते. मात्र, लॉकडाऊन शिथिलतेनंतर युवावर्ग घराबाहेर पडत असल्याने शहरात सर्वाधिक बाधित हे 20 ते 30 वयोगटातील आहेत.
आतापर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये संबंधित व्यक्तीच्या संपर्कात त्याचे कुटुंबीय येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून 20 ते 30 वयोगटातील रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीमध्ये मित्रांचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळून आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये ही बाब समोर आली असून, प्रशासन आता या वयोगटातील रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे.
– रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा