शेवगाव : यंदा सर्वत्र पावसाने आबादानी झाली असल्याने येथे सध्या निसर्ग मस्तीत आहे. अशावेळी या परिसरातील श्रावणी पोळा मोठ्या धुमधडाक्यात झाला असता, मात्र करोना महामारीने यावेळी शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यंदाच्या श्रावणी बैलपोळ्यावर करोनाचे सावट आहे. जमावबंदी व लॉकडाऊनमुळे सार्वजनिक पोळा भरणार नाही.
करोना विषाणूजन्य साथीने सर्वत्र थैमान घातल्याने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वरचेवर लॉकडाऊन वाढतो आहे. शेवगाव परिसरात करोना बाधितांच्या संख्येने आता 3 शतकाला गवसणी घातली आहे. शेवगाव शहरातील अनेक उपनगरासह चापडगाव, दहिगाव ने, ढोरजळगाव ने, गरडवाडी, शहाजापूर आदी ठिकाणे आज प्रतिबंधित आहेत. तशात सर्वच धंदे बंद असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाचे जाहीर कौतुक करता येणार नाही.
एरव्ही शेवगावात १९१२ पासून सार्वजनिक पोळा भरतो आहे. येथे त्यासाठी राखीव पोळामैदान आहे. या मैदानावर शहर परिसरातील सर्व पशुपालक आपापल्या पशूंना सजवून सवाद्य मिरवणुकीने आणतात. नगरपरिषदेची समिती त्यातून उत्कृष्ट पशूंची निवड करून त्याच्या मालकाला मानाचा शेला, श्रीफळ देऊन सत्कार करते. नगर परिषदेने सजविलेला पोळ प्रथम वेशीतून सोडला जातो नंतरच पोळा फुटतो. पूर्वापार चालत आलेली ही प्रथा आजही चालू आहे.
अलीकडे यांत्रिकीकरण वाढल्याने पशुची संख्या कमी झाल्याने या मैदानावर अतिक्रमणे वाढली आहेत. तरीही ही सर्व अतिक्रमणे पोळ्याच्या दिवशी विनातक्रार हटविली जातात . मात्र यावेळी ती वेळ येणार नाही. जमावबंदी व लॉक डाऊनमुळे सार्वजनिक पोळा भरणार नाही.
शेवगावात झुली, बाशिंग, सिंग दोरी, माथवटी, शेम्ब्या, मोहरक्या, पितळी तोडे, दृष्ट पट्टा, हिंगूळ, गेरू आदी पोळ्याच्या साहित्याचे दहा-बारा मोठे व्यवसायिक आहेत. मात्र त्यांच्याकडे सध्या तरी म्हणावे तसे गिऱ्हाईक नाही. आठवडे बाजारही बंद आहे. लॉकडाऊनमुळे बहुतेक जिनिंग-प्रेसिंग बंद आहेत. त्यामुळे सुताचे भाव 10 टक्के वाढले आहेत. अन्य साहित्याचे दर स्थीर आहेत. कासरा, माथवटी, वेसण करणारे कारागीर येत नाहीत. बहुतेक ट्रान्सपोर्टही बंद आहेत. यंदा सुताच्या कासऱ्या ऐवजी नायलॉनचे आकर्षक गोफ उपलब्ध आहेत.