नवी दिल्ली – देशात मोठ्या प्रमाणात करोनाची संसर्ग वाढला आहे. लाखोच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. सर्वच क्षेत्रात करोनाचा प्रभाव आहे. तरीही देशात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरळीत सुरू होती. मात्र आता आयपीएलवर देखील करोनाचं सावट गडद झालं आहे. त्यामुळे खेळाडू माघार घेताना दिसत आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेतून माघार घेतली. त्याने या संदर्भात आज घोषणा केली. त्यानंतर लगेचच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील अॅडम झम्पा आणि केन रिचडर्सन या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपण मायदेशी परतत असल्याचे जाहीर केले.
काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्स संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टाय यानेही आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. भारतात करोनाचा प्रकोप आणखी वाढल्यास आपल्याला ऑस्ट्रेलियाचे दरवाजे बंद होऊ शकतात, अशी भीती या खेळाडूंना असल्याची चर्चा आहे.
दरम्यान दिल्ली, मुंबई आणि चेन्नईतील करोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे या शहरांतील नियोजित सामन्यांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्पर्धेतून आतापर्यंत आर. अश्विन, अँड्य्रू टाय, केन रिचडर्सन, अॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन या पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे.