टोकियो- कोरोना विषाणूच्या साथीमुळे जपानमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याची तयारी सरकारने केली आहे. जपानची राजधानी टोकियो आणि अन्यत्र करोना विषाणूचा संसर्गाचा फैलाव झाला असल्याने आणीबाणीचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान शिंझो आबे आज संध्याकाळी तज्ञांच्या समितीबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर आणीबाणी घोषित केली जाण्याची शक्यता आहे.
युरोप आणि अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याचे समजते आहे. टोकियोमध्ये रविवारी 148 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे यासंदर्भात ठोस कृती करण्याचे सरकारवर दडपण वाढत आहे.
टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी यापूर्वीच नागरिकांना विनाकरण घराबाहेर न पडण्याचे आणि घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. अद्याप कोणताही निर्णय औपचारिकपणे घेतला गेलेला नाही. टोकियोचा विचार करूनच उपाय योजना निश्चित केल्या जातील, असे युनिको कोइके यांनी पत्रकारांना सांगितले.