भीतीचे वातावरण : बेड्स, आयसीयूच्या संख्येत वाढ
संबंधित रुग्णांना दुबई सहल ठरली तापदायक
पुणे – शहरात करोना विषाणूचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आणि मंगळवारी सकाळपासूनच खळबळ उडाली. यानंतर पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास पथके नेमण्यात आली. यामध्ये रात्रीपर्यंत आणखी 3 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे शहरात करोनाबाधितांची संख्या 5 वर गेली असून, हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, सध्या डॉ. नायडू रुग्णालयात 12, तर मुंबई येथे 3 संशयित व्यक्ती दाखल आहेत.
संबंधित रुग्णांना दुबई सहल चांगलीच भोवली आहे. दि.1 मार्च रोजी दुबईहून मुंबईमार्गे पुण्यात आलेल्या दाम्पत्याला सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी केली असता, नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सोमवारी (दि. 9) सायंकाळपासून खळबळ उडाली.
विभागीय आयुक्तांनी तत्काळ बैठक घेऊन हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलत जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिका आयुक्त, आरोग्य विभाग यांना सूचना दिल्या. मंगळवारी दिवसभरात मॅरेथॉन बैठकांबरोबरच पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तीच्या घरातील सदस्य, तसेच त्यांना मुंबईहून पुण्यात घेऊन आलेल्या टॅक्सी ड्रायव्हरसह त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये बाधितांची मुलगी, विमानात त्यांचा सहप्रवासी, टॅक्सी ड्रायव्हर यांची तपासणी केली असता त्याचे नमुनेही पॉझिटिव्ह आले आहेत. अवघ्या 12 तासांत करोनाचे 5 रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली असून, अन्य देशासह पुण्यातही हा विषाणू पसरू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. त्यामध्ये बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची (उदा. विमानातून आले सहप्रवाशी, सहलीसाठी गेलेला 40 जणांचा ग्रुप, मुंबईहून पुण्यात येण्याचा प्रवास, ज्या ठिकाणी राहतात तेथील सर्व व्यक्ती) तपासणी केली जात असून, त्यासाठी पथकांची संख्या वाढवण्यात आली असून, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांचीही संख्या वाढवण्यात आली आहे.