महापालिकेचे रुग्णालयांना पत्र
पुणे – चीनमध्ये थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा धसका जगभराने घेतला आहे. महाराष्ट्रात चीनमधून आलेल्या विमान प्रवाशांना उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यातील डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात सरकारकडून सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मात्र, ज्या संशयित रुग्णांना या शासकीय रुग्णालयांची सुविधा नको असेल त्यांना खासगी रुग्णालयातही उपचार मिळावेत यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांना महापालिकेने विनंती केली आहे. त्यासाठी जी रुग्णालये अशा रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड करण्यास तयार आहेत. त्यांच्याकडून पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव मागवले आहेत. पालिकेने शहरातील प्रमुख 25 रुग्णालयांना याबाबत पत्र पाठवले आहे. तर आतापर्यंत 3 ते 4 रुग्णालयांनी याबाबत पालिकेकडे विचारणा केली असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी स्पष्ट केले.
हंकारे म्हणाले, करोनाबाबत महापालिकेकडून सर्व उपाययोजना केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासी आल्यानंतर त्यांची माहिती विमानतळ प्राधिकरण तसेच राज्य शासनाकडूनही कळविली जाते. या रुग्णांना नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. मात्र, अनेक प्रवाशांना शासकीय रुग्णालयात उपचार नको असल्यास त्यांना खासगी रुग्णालयातही उपचाराची सुविधा असावी म्हणून खासगी रुग्णालयांना ई-मेल पाठवून उपचाराच्या सुविधेबाबत विचारणा केली आहे. त्यासाठी हॉस्पिटलला सुमारे 50 हून अधिक निकष पूर्ण करावे लागणार आहेत.त्यामुळे काही ठराविक रुग्णालयांनाच विनंती केली असल्याचे डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले.