मंचर -आंबेगाव तालुक्यात मंगळवारी (दि. 7) करोना रुग्णांच्या संख्येत चारने वाढ झाली आहे. तालुक्यात आता एकूण करोना रुग्णाची संख्या 69 झाली आहे. आलेल्या रिपोर्टमध्ये मंचर येथील 55 वर्षीय व 23 वर्षीय असे दोन व थोरांदळे येथील 23 वर्षीय व घोडेगाव येथील 51 वर्षीय व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
मंचर येथील एका 55 वर्षीय बेकरीवाल्याचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. अचानक मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनाने खबरदारी म्हणून या व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा रिपोर्ट मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आले असल्याने त्याचा मृत्यू करोनाने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेकरीचालकाच्या 23 वर्षीय मुलाचाही ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. थोरांदळे येथे 23 वर्षीय तरूणाला करोनाची लागण झाली असून तो याच बेकरीवाल्याच्या नात्यातील होता व त्यांच्या संपर्कात आला होता.
घोडेगाव येथील रुग्ण हा न्यायालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असून न्यायालयाच्या गेटवर न्यायालयात येणाऱ्याची नोंद करण्याचे काम करत आहे. काही दिवसांपूर्वी एकलहरे येथे अत्याचार झालेली अल्पवयीन पीडित मुलगी घोडेगाव न्यायालयात जबाब देण्यासाठी आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीला करोनाची लागण झाले असल्याचे कळाल्यानंतर या मुलीच्या संपर्कात आलेल्या न्यायालयातील अनेकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या शिपायाचे स्वॅब देखील तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आंबेगाव तालुक्यात आज अखेर करोना रुग्णांची संख्या 69 झाली असून त्यातील 48 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर 18 जण उपचार घेत असून तीन जण मयत झाले आहेत.