मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगावव तालुक्यात डॉक्टर दाम्पत्यालाच कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर आज आणखी ५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मालेगावात कोरोनाबाधितांची संख्या ३६ वर पोहचली आहे.
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता मालेगाव शहरात तगडा बंदोवस्त लावण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कडक अंलबजावणीसाठी मालेगावात राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर, ७०० पोलिसांचा फ़ौजफ़ाटा तैनात करण्यात आला आहे.
कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता प्रशासनाने मालेगाव शहरातील सर्व बँक पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १९ एप्रिल पर्यंत बँका बंद ठेवण्याचे आदेश प्रसाशनाने दिले आहेत. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी मालेगावला रेड झोन घोषित करावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ७०२ वर पोहचली आहे. मात्र आतापर्यंत १७८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.