नवी दिल्ली : दक्षिण कोरियामध्ये अशा रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ज्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण कोरियात सोमवारी अशी १६ प्रकरणे समोर आली आहे. जे कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. चीन नंतर सर्वाधिक कोरोना प्रसार दक्षिण कोरियामध्ये झाला होता. मात्र तेथील सरकारने त्यावर लवकरच उपायोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
मात्र, सोमवारी पुन्हा कोरोनाबाधितांचे दक्षिण कोरियात २५ नवे प्रकरणे समोर आले आहे. आरोग्य अधिकारी पुन्हा रुग्णांना कोरोना कसा झाला याचा तपास करीत आहेत. दरम्यान, कोरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोल प्रिव्हेंशनचे संचालक जोंग इन क्यॉंग यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याऐवजी हा विषाणू पुन्हा सक्रिय आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या मते तपासणीत दोषामुळे पुन्हा रुग्णांना कोरोना संसर्ग होतो आहे.