संगमनेर (प्रतिनिधी) -संगमनेरची करोनाबाबतीत हळूहळू मालेगावकडे वाटचाल सुरू झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील मालदाड रोड व लखमीपुरा भागातून नव्याने दोन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तसेच आज सकाळी नगरच्या सामान्य रुग्णालय येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मोगलपुरा येथील 33 वर्षीय इसमाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मालदाडरोडवर सापडलेल्या 72 वर्षीय संक्रमित महिलेचे निधन झाले आहे. संबंधित महिलेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. तालुक्यातील बधितांची संख्या 84 झाली असून बधितांच्या मृत्यूंची संख्या 9 झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार करोनासारखी लक्षणे आढळलेली शहरातील मालदाड रोड भागातील एक 72 वर्षीय महिला संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. तसेच फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारा एक 22 वर्षीय तरुणही त्या रुग्णालयात भरती झाला होता. या दोघांचे स्त्राव खासगी प्रयोगशाळेत तपासणीस पाठविण्यात आले होते. दोघेही करोना संक्रमित असल्याचे समोर आले. ‘त्या’ खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या त्या महिलेचे निधन झाले. मात्र सदर महिलेचा मृत्यू करोनामुळे नव्हे, तर हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर येत आहे.
त्यासोबतच एकापाठोपाठ तीन रुग्ण आढळलेल्या लखमीपुरा या कन्टेन्मेंट असलेल्या भागातील एका 22 वर्षीय तरुणालाही करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदरचा युवक कन्टेन्मेंटमधील रहिवासी असला, तरीही तो फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. त्यातूनच त्याला कोरोनाचे संक्रमण झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दोन्ही व्यक्ती प्रशासनाची झोप उडविणाऱ्या असून, त्यांना कोणाकडून करोनाची लागण झाली, हे शोधण्यासाठी प्रशासनाला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच आज सकाळी सामान्य रुग्णालय नगर येथून प्राप्त अहवालानुसार संगमनेर येथील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु त्यात एका 24 वर्षीय युवती असून, ती मुंबई येथून थेट नगर येथे उपचारासाठी गेल्याने संगमनेरमध्ये तिचा कुणाचाही संपर्क आला नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सदर युवती ही मुंबईची असून, संगमनेरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने ती थेट मुंबईहून नगरला गेल्याने तिची गणती कुठे करावी, या संभ्रमात प्रशासन आहे.