मुंबई, – शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना करोनाची बाधा झाली आहे. यासंदर्भात स्वतः रामदास कदम यांनी आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग पेजवरुन माहिती दिली आहे. प्रकृती ठीक वाटत नसल्याने करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे, असे रामदास कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्सानुसार मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो आहे, असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, आता सर्व काही ठीक असून योग्य ते उपचार सुरू आहेत, असेही कदम यांनी आपल्या समर्थकांना पोस्टमधून सांगितले आहे. पोस्टच्या शेवटी कदम यांनी सर्वांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच कदम यांनी सर्वांना त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे रामदास कदम यांनी 22 तारखेला करोना लसीचा पाहिला डोस घेतला होता तरी त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु हे लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे. आपले आणि कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपणही लवकरात लवकर लस घ्यावी ही विनंती, असे रामदास कदम यांनी 22 मार्च रोजी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.