नवी दिल्ली – करोनाचे देशात रविवारी 43 हजार 846 नवे बाधित सापडले. गेल्या चार महिन्यांतील हा उच्चांक आहे. त्यामुळे देशातील बाधितांची संख्या एक कोटी 15 लाख 99 हजार 130 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत करोनाने 24 जण मरण पावले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली.
देशात करोनाने मरण पावलेल्यांची एकूण संख्या एक लाख 59 हजार 755 वर पोहोचली आहे. नव्या करोनाबळींमधील 86. 8 टक्के मृत्यू हे केवळ सहा राज्यांत झाले आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.
17 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासांत एकही करोनाबळी नोंदवला गेला नाही. महाराष्ट्रात शनिवारी 27 हजार 126 बाधित आढळले. त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या 24 लाख 49 हजार 147 वर पोहोचली आहे. तर राज्यात सर्वाधिक करोना मृत्यू नोंदवले गेले असून त्यांची संख्या 53 हजार 300 वर पोहोचली आहे.
पंजाबमध्ये दोन हजार 587 बाधित आढळले. गेल्या सहा महिन्यांत ही एका दिवसांतील सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या दोन लाख 10 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 38 जण मरण पावल्याने मृतांची संख्या सहा हजार 280 वर पोहोचली आहे.
केरळमध्ये गेल्या 24 तासांत दोन हजार 78 बाधित सापडले. तर 15 जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या 11 लाख दोन हजार 702 वर पोहोचली आहे. छत्तिसगढमध्ये एक हजार 273 जण बाधित झाले ही वर्षातील सर्वात उच्चांकी आकडा आहे. तर 11 जण मरण पावले. तामिळनाडूत एक हजार 243 बाधित सापडले.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आठ लाख 65 हजार 693 वर पोहोचली तर कर्नाटकात एक हजार 798 नवे बाधित शनिवारी आढळले.