CoronaNews : गोरेगावमधील नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा

मुंबई  – करोनाच्या वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

या केंद्राला भेट देऊन त्यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी नेस्को कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त (विशेष) संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त (पी- दक्षिण) संतोषकुमार धोंडे उपस्थित होते.

या कोविड सेंटरला डीआर सिस्टिम व एक्‍सरे मशिन- सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल. दरम्यान, नेस्को कोविड सेंटरची गरज व रुग्णसेवेसाठी आमदार निधीतून दोन्ही मशिन्स देण्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी मान्य केले. या मशिन्स लवकरात लवकर रुग्णसेवेसाठी नेस्को सेंटरला सुपूर्द केल्या जातील, असे स्पष्ट केले.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव 1500 बेड्‌स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी 500 बेड्‌स ऑक्‍सीजन सुविधेसह सुसज्ज असतील. 15 एप्रिलपासून सर्व बेड्‌स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या 2900 खाटांसह एकूण 4300 रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल.

रेमडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे 1000 व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्‍सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्‍स टाक्‍यांमध्येही उपलब्ध आहे. डॉक्‍टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात अधिक भर पडणार आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.