नवी दिल्ली – करोना संसर्गाची दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. दुसऱ्या लाटेत सर्वच क्षेत्रातील आणि वयोगटातील लोकांना करोनाची बाधा झाली आहे. यामधून राजकीय नेते सुद्धा सुटले नाहीत. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी करोनामुळं जीव गमवावा लागला आहे. तर अनेक नेते रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या एका मंत्र्याचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये करोनाबाधित मंत्री फरशी पुसताना दिसत आहे.
फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती मिझोरम सरकारमधील उर्जामंत्री आर. लालजिर्लियाना आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. फरशी पुसतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला असून देशभरात त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.
71 वर्षाचे लालजिर्लियाना मिझोरम सरकारमध्ये ऊर्जामंत्री असून फोटोमध्ये ते रुग्णालयातील गाऊनमध्ये आहेत. त्यांचा हातात पोछा दिसत असून ते कोविड वार्डातील जमीन साफ करत आहेत. हा फोटो जोराम मेडिकल कॉलेजमधील असल्याचं म्हटलं जात आहे. लालजिर्लियाना यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान फोटो व्हायरल झाल्यानंतर लालजिर्लियाना यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. ते म्हणाले, की माझा उद्देश रुग्णालयातील स्टाफला लाजवणं नव्हता. वार्डातील सफाईसाठी त्यांनी सफाई कर्मचाऱ्याला बोलावलं होतं. मात्र, त्यानं काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं मंत्र्यांनी स्वतःच सफाई करण्यास सुरुवात केली.
झाडून घेणं किंवा घरातील काम करणं माझ्यासाठी नवीन नाही. ही कामं मी घरी किंवा जिथे गरज असेल तिथे करत असतो. मंत्री आहे म्हणून मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळं किंवा वरचढ समजत नाही, असही लालजिर्लियाना यांनी म्हटलं. माझी प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही त्यांनी नमूद केल.