नाशिक -देशभरात करोना संसर्ग धुमाकूळ घालत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वच वयोगटातील मृतांचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ नागरिकांना करोनाचा धोका अधिक असून मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र नाशिक येथून एक सकारात्मक बातमी आली असून येथे ९२ वर्षीय आजोबांनी करोनावर मात केली.
तीन वेळा आलेला हृदयविकाराचा झटका, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार आणि प्रोस्टेट अशा अनेक व्याधींशी झुंजणारे 92 वर्षांचे मनमाड येथील आजोबा अवघ्या आठ दिवसात कोरोनावर मात करून घरी परतले. एचआरसिटी स्कोर 13 व ऑक्सिजन पातळी 79 असूनही योग्य उपचारांना सकारात्मकतेची साथ दिल्याने हे शक्य झाले आहे.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील निवृत्त रेल्वे कर्मचारी नामदेव शिंदे यांना मार्चमध्ये करोनाने ग्रासले होते. नांदगाव कोविड केअर सेंटरमध्ये ते दाखल झाले. अनेक व्याधींनी ते ग्रस्त होते. त्यातच त्यांना यापूर्वी तीन वेळेला हृदयविकाराचा झटका येऊन गेला असल्याने उपचारांचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. किडनीच्या व्याधीमुळे रेमडेसिवीर किंवा अन्य स्टेरॉईड देणे शक्य नव्हते. एचआरसिटी स्कोर 13 व ऑक्सिजन पातळी 79 असूनही सकारात्मकतेच्या बळावर उपचाराला योग्य प्रतिसाद देत ते आठ दिवसात बरे झाले, असे सेंटर प्रमुख डॉ. रोहन बोरसे म्हणाले.