CoronaFight : उद्धव ठाकरेंच्या मागणीला यश; देशात ऑक्सिजन टँकरचे ‘एअरलिफ्टींग’ सुरू

मुंबई – देशावर करोना संसर्गाचे मोठे संकट घोंगावत आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालये अपुरी पडत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला यश आले आहे. ठाकरे यांनी ऑक्सिजन टँकचे एअरलिफ्टींग करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. त्यामुळे आता हवाई दलाने देखील करोनाविरुद्धच्या लढाईत पुढाकार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, येणाऱ्या काळात महाराष्ट्राला एप्रिलच्या अखेरपर्यंत दररोज 2 हजार मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे. सध्या 1200 टन ऑक्सिजनवर भागत आहे. मात्र रोज ऑक्सिजन रस्त्याने वाहतूक करण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत देशाच्या पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून ऑक्सिजनचे टँक एअरलिफ्ट करण्याची मागणी ठाकरे यांनी पत्रात केली होती.

दरम्यान उद्धव ठाकरे यांची ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. हवाईदलाच्या पथकाने आता ऑक्सिजन कंटेनर्स, आरोग्यांसंबंधीत उपकरणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट करण्याची जबाबदारी घेतली आहे. भारतीय हवाई दलाच्या C17 या विमानातून दोन मोठे ऑक्सिजन कंटेनर्स तर IL 76 मधून एक रिकामी कंटेनर्स बंगालच्या पन्नागढमध्ये पोहचवण्यात आले. तसेच भारतीय हवाईदलानं डीआरडीओचे ऑक्सिजन कंटेनरदेखील बंगळुरूहून – दिल्लीच्या कोव्हिड सेंटरपर्यंत पोहचवले आहेत. भारतीय हवाई दलाकडून देशातील विविध राज्यांची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी अनेक मोहिमा सुरु झाल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.