CoronaFight : आर आर पटील यांच्या मुलाची तासगावकरांच्या ऑक्‍सिजनसाठी धडपड

सांगली – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोननंतर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील मध्यरात्री ऑक्‍सिजन घेऊन ग्रामीण रुग्णालयात गेले. तासगावातील रुग्णांसाठीही त्यांनी ऑक्‍सिजनची सोय केली. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या मुलाची रुग्ण वाचवण्यासाठी धडपड पाहून उपस्थितांचे मन हेलावले.

रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना फोन केला. रोहित, ऑक्‍सिजन टॅंकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरवून घे’ अजितदादांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्‍सिजन टॅंकर उतरवून घेतला. त्यांनतर यातील 23 जंबो टाक्‍या आणि 2 ड्युरा टाकी ऑक्‍सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्‍सिजनभावी कोरोनाग्रस्त रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेली ही धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्‍यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज शंभरहून अधिक जणांना कोरोनाची बाधा होत आहे. तासगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य खासगी ठिकाणी कोरोना हॉस्पिटल सुरु करण्यात आली आहेत. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गरजूंना ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करुन देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचीही जिल्हाभर बेड शोधताना फरफट होत आहे.

पाटील कुटुंबामुळे 56 ऑक्‍सिजनेटेड बेड
गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी 56 ऑक्‍सिजनेटेड बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सध्या अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र एकूणच राज्यभरात रुग्णसंख्या वाढ वेगाने होत असल्याने ऑक्‍सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे.

रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी
तासगावतही कोरोना रुग्णांसाठी ऑक्‍सिजन कमी पडत आहे. या स्थितीनंतर तासगावातील रुग्णांसाठी ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध करुन घ्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा ते सतत पाठपुरावा करत होते. तासगावातील गंभीर स्थिती ते सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ऑक्‍सिजन टॅंकरची मागणी लावून धरली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.