CoronaEffect : महानगरातील परप्रांतीयांची घरवापसीसाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी

मुंबई  – करोना नियंत्रणासाठी महाराष्ट्रात अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य व्यवसाय 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील महानगरांत रेल्वे आरक्षण केंद्राच्या बाहेर स्थलांतरितांचे लोंढे थांबलेले आढळून येत आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर तोबा गर्दी उसळली आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेंची चौकशी अनेकांनी केली. मात्र, आम्ही त्यांना रेल्वेचे आरक्षण करण्यास सांगितले आहे, असे टिळक टर्मिनसवरील एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले. येथे मंगळवार दुपारपासून रांगेत थांबलेल्या नियाझ अहमद या तीस वर्षीय तरुणाने सांगितले की, महंमद अली रस्त्यावर मी लिंबू सरबत विकतो. मी मुंबईत गेली 15 वर्ष राहतो. गावी पत्नी आणि मुलगा आहे. मी येथे बेघर असून रस्त्यावर राहतो. सध्या उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. घरी गेल्यावर मला काही नोकरी मिळणार नाही पण दोन वेळचे जेवण मिळू शकते. येथे मी उपाशीपोटी मरेन. मी गावी फुकटच जाईन पण जर तिकीट चेकरने पकडले तर मी दंड भरेन.

अहमदप्रमाणेच सुरज यादव (वय 22) आणि कृष्णकुमार नामदेव (वय 33) हे दोघे मध्य प्रदेशातील सतनाचे रहिवासी आहेत. ते तातडीने आरक्षण केंद्रावर आले आहेत. यादव यांनी सांगितले की, आम्ही नेरूळमधील लहान हॉटेलमध्ये काम करतो. आमचे मालक म्हणाले, आम्ही पगार काही देणार नाही पण जेवणाची सोय करू. मग आम्ही काय करू? आम्ही वाट पाहू शकत नाही. आम्हाला गेलेच पाहिजे. गावी काम मिळेल याची शाश्‍वती नाही. पण, आम्ही शेतीभाती… काहीतरी करू.

सीएसएमटीवर मंगळवारी रात्री बिहारमधील आचाऱ्यांचा एक गट निराश अवस्थेत थांबला होता. काऊंटर बंद असल्याने ते तणावात होते. त्यांच्यापैकी एक राजेश कुमार दास (वय 36) म्हणाले, आमच्या बॉसने आमच्यापैकी 60 जणांना घरी जाण्यास सांगितले आहे. मग आम्ही काय करू? आम्हाला येथे राहणे परवडणारे नाही. आम्ही विना आरक्षित बोगीमधून प्रवास करू.

या अंशत: लॉकडाऊनचा दादरच्या फूल बाजारातील विक्रेत्यांनाही बसला आहे. फुलांची विक्री करणारे मोहन जनभरे म्हणाले, पूर्ण दिवसांत काहीही व्यवसाय झालेला नाही. त्यामुळे आम्हाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पूर्वी आम्ही दिवसाला 300 रुपये कमवायचो. आता 200 रुपयेही हातात धड येत नाहीत. आता पोलीस अम्हाला पूर्ण बंद ठेवायला सांगत आहेत.

आरक्षितांनाच रेल्वेत प्रवेश
करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही पक्के तिकीट असणाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देणार आहोत. कोणतीही जादा रेल्वे सुरू केली तर त्याची घोषणा आधी करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही अफवेवर विश्‍वास ठेवून तिकीट आरक्षणासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.