वाशीम – महाराष्ट्रातील करोना रुग्णांमध्ये वाढ झालेली असताना आता मृतांच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात आता राजकीय क्षेत्रातील नेत्यांची भर पडत आहे. कारंजा बाजार समितीचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश डहाके यांचं आज दुपारी १२ वाजता करोनाने निधन झालं. डहाके हे राष्ट्रवादीचे विदर्भातील मातब्बर नेते मानले जात होते.
डहाके यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर आधी अमरावती आणि नंतर नागपूर येथे उपचार सुरू होते. अमरावती येथे उपाचार झाल्यानंतर ते करोनामुक्त झाले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राज्याचे गृहमत्री दिलीप वळसे पाटील यांचे ते मेव्हने होते.
मागील १५ वर्षांपासून डहाके कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. तर २००९ ते २०१४ या कालावधीत आमदार होते. मध्यंतरी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा राष्ट्रवादीत परतले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. डहाके यांच्या निधनाने जिह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.