नवी दिल्ली – भारतीय क्रीडा विश्वासाठी आजचा दिवस वाईट ठरला. देशभरात थैमान घालत असलेल्या करोनाने दोन दिग्गज हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना आपल्यापासून हिरावलं आहे. रविंदर पाल सिंह आणि एमके कौशिक अशी या दोघांना करोनाची लागण झाली होती. दोघंही गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भारताच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या एमके कौशिक यांना दिल्लीतील एका नर्सिग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं. कौशिक ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंब आहे. कौशिक यांना १७ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आलं होतं. कौशिक १९८० सालच्या मॉस्को ऑलम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते.
दरम्यान भारताचे माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंग यांचंही कोरोनामुळे निधन झालं. गेल्या दोन आठवड्यांपासून रविंदर पाल करोनाविरोधात लढत होते. अखेर आज लखनऊ येथे त्यांच निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. १९८० सालच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात रविंदर यांचाही समावेश होता.