बलिया – उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील गंगा नदीत आणखी सात प्रेते वाहून आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या जिल्ह्यात नदीत वाहून आलेल्या एकूण प्रेतांची संख्या आता 52 झाली आहे. ही प्रेते बाहेर काढून जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्यावर अत्यंसस्कार केले जात आहेत.
मंगळवारी रात्री जिल्ह्यातील उजीयार, कुल्हादिया आणि भरौली घाटांवर किमान 45 मृतदेह वाहून आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्याच भागात आज आणखी सात प्रेते आढळून आली आहेत. या भागातील उपविभागीय अधिकारी राजेश यादव म्हणाले की, ही प्रेते नेमकी कोठून येत आहेत याचा आम्ही अंदाज घेत आहोत. काही प्रेते बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून आली असावीत, अशी शंका त्यांनी बोलून दाखवली. बक्सर हे ठिकाण बलियाच्या खालच्या भागात असले तरी काही वेळा वाऱ्याच्या प्रवाहामुळे पाण्याचा प्रवाह उलटा वाहतो, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रेतांमुळे रोगराई पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून त्या प्रेतांवर त्वरित अंत्यसंस्कार करण्याची दक्षता घेतली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.