कोलकाता – करोना संसर्गाची दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. दुसऱ्या लाटेत सर्वच क्षेत्रातील आणि वयोगटातील लोकांना करोनाची बाधा झाली आहे. यामधून राजकीय नेते सुद्धा सुटले नाहीत. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी करोनामुळं जीव गमवावा लागला आहे. तर अनेक नेते रुग्णालयात उपचार घेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचं करोनाने निधन झालं आहे.
ममता बॅनर्जी यांचे छोटे भाऊ असीम बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. आलोक रॉय यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचा धाकटा भाऊ असीम बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी असीम बॅनर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान करोना प्रोटोकॉलनंतर असीम बॅनर्जी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. असीम बॅनर्जी गेल्या एक महिन्यापासून करोना संक्रमणाने ग्रस्त होते. कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी असीम यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.