वेल्हे (प्रतिनिधी) – पुणे शहराला अत्यंत जवळ असलेल्या वेल्हे तालुक्यात कोरोनाने कहर केला असून एकाच दिवसात ४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेल्हे तालुक्यातील नव्याने आढळून आलेल्या ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोळवडी येथील ४३ वर्षीय एक पुरुष, वांजळे येथील ४४ वर्षीय एक पुरुष व निगडे मोसे येथील ३२ वर्षीय व ७५ वर्षीय अशा दोन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती वेल्ह्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
वेल्हे तालुक्याला जिल्हा परिषदेचे दोन गट असून दोन्ही गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींना सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. निगडे मोसे हे जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांचे मूळ गाव, तर वांजळे हे जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांचे मूळ गाव आहे.
या दोन्ही गावात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. आपल्या नागरिकांना वाचविण्यासाठी पदाधिकारी जिवाचे रान करून आरोग्य सुविधा मिळवून देण्याचा अटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.
मागील चार महिन्यांपासून कोरोनाविरुध्द लढा देणारे वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे हे आपल्या टीममधील सर्व हतबल झालेल्या कोरोना योध्यांना सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा देत लढण्यासाठी बळ देत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर हे गेली चार महिने आपले घरदार विसरून तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
वेल्हे तालुका हा अतिवृष्टीचा तालुका म्हणून सर्वज्ञात आहे. धो-धो कोसळत असलेल्या पावसात स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या टीमचे मनोबल वाढविण्यासाठी हे अधिकारी आपले कौटुंबिक सौख्य विसरून गेले आहेत.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सध्या पुणे शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे व्हेंटिलेटर असलेल्या बेडची कमतरता जाणवत असून वेल्हे तालुक्यातील एका अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला पुण्यात बेड उपलब्ध होत नसल्याने तालुका प्रशासन देखील हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.