शिरूर शहरात कोरोनाचा कहर, एकाच दिवशी आढळले 7 नवीन रूग्ण

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर शहरात एकाच दिवशी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली आहे. सर्व रूग्ण डंबेनाला, प्रीतम प्रकाश नगर, सरदार पेठ, रेव्हेन्यू कॉलनी ,कामाठीपुरा या भागातील आहेत. यामुळे शिरूर शहरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने खळबळ उडाली आहे.

काल शिरूर शहरातून 25 जणांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे नमुने पॉझिटिव्ह तर खाजगी लॅबमधून तपासणी केलेल्यापैकी एकाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

शिरूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सापडलेल्या डंबेनाला भागातील घरातील नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या त्याच्या घरातील 30  व 36 वर्षीय वयाच्या दोन महिला, प्रीतम प्रकाश नगर येथील 29 वर्षाचा तरुण कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने तसे  47 वर्षीय  कोरोना बाधित कंपनी कामगाराच्या  संपर्कात आल्याने सरदार पेठ येथे सापडलेल्या कंपनी कामगारांची 32 वर्षीय पत्नी तसेच कामाठीपुरा येथेही आढळलेल्या कंपनी कामगाराच्या 53 वर्षीय वडिलांचा, तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील एक कंपनी कामगार असे सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

शिरूर शहरात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कंपनी कामगार आता शिरूर शहराला बाधित करीत आहेत. यासाठी आता प्रांताधिकारी यांनी कंपनी कामगारांबाबत वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा शिरूर शहरात कंपनी कामगार संपूर्ण शहर कोरोना बाधित करण्यास कारणीभूत ठरणार आहेत. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून नागरिक आता भयभीत झाले आहेत.

शिरूर शहरात नागरिकांनी भिऊन न जाता सतत मास्क वापरणे, सतत हात धुणे, वाफ घेणे, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, फिरताना कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नये, सोशल डिस्टन्सं पाळावे असे आवाहन शिरुर नगर परिषदचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.