मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम आता नोकऱ्यांवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.
येत्या काही दिवसात देशभरातील 1100 कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने ई-मेलद्वारे कपातीची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. त्याआधी स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोने आपल्या 13 टक्के कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती.
स्विगीचे सहसंस्थापक श्रीहर्ष माजेती यांनी एक पत्र काढून या विषयी माहिती दिली. या पत्रात त्यांनी म्हटले की, फूड डिलिव्हरी व्यवसायावर खोल परिणाम झाला आहे आणि येत्या काही दिवसात हा परिणाम कायम राहिल. मात्र आगामी काळात हा व्यवसाय रुळावर येईल, अशी आशा आहे. परंतु आम्हाला आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची आणि येत्या काळात कोणत्याही प्रकारच्या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी कपातीची गरज आहे. दरम्यान, श्रीहर्ष माजेती यांनी, ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल, त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा पगार, अॅक्सिलिरेटेड वेस्टिंग, डिसेंबरपर्यंत आरोग्य विमा आणि कंपनीत त्यांनी जेवढी वर्षे काम केलं, त्यात प्रत्येक वर्षासाठी एक महिन्याचे अतिरिक्त पगार दिला जाणार असल्याचे सांगितले.