बीजिंग-ब्राझीलमधून चीनमध्ये आयात करण्यात आलेल्या चिकनविंगमध्ये करोनाचे विषाणू आढळल्याने देशवासियांत खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फ्रोझनफुड खाऊ नये, अशी स्पष्ट सूचना चीन सरकारने तसेच आरोग्य मंत्रालयाने देशवासियांना केली आहे.
चीनमधील शिनझेन शहरात फ्रोझन फूड विकत घेतना काळजी घ्यावी, असे स्थानिक प्रशासनानेही म्हटले आहे. शिनझेनमध्ये ब्राझीलमधून आयात करण्यात आलेल्या चिकन विंग्सच्या चाचणीत करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. ब्राझीलमधील सॅण्टा कार्टारिना शहरामधील अरोरा ऍलिमोन्टोज येथील कारखान्यामधून आयात करण्यात आलेल्या या मांसामध्ये करोनाचे विषाणू आढळले आहेत.
काही दिवसांपूर्वीच चीनच्या यानताई बंदरात आयात करण्यात आलेल्या मासळीच्या पाकिटांवरही करोनाचे विषाणू आढळून आल्याने एकच खबळ उडाली होती. जुलै महिन्यामध्ये आयात करण्यात येणाऱ्या मासळीपैकी शिंपल्यांच्या पाकिटांवर करोनाचे विषाणू आढळून आले होते. इक्वाडोअरमधून आलेल्या पाकिटांवर करोना विषाणू आढळून आल्यानंतर चीनने या देशातून मासळी आयात करण्यावर बंदी घातली होती. त्यामुळेच फ्रोझनफुड घेताना नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.