मुंबई – सध्या जगामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे या वाढत्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे. भारतात देखील सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. आता तो वाढवून 3 मे पर्यंत करण्यात आला आहे.
दरम्यान, या अशा गंभीर परिस्थिती आपल्या जीवाची पर्वा न करता, सामान्य लोकांची मदत करणाऱ्या लोकांचे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्यासह लेडी गागा आणि जगभरातील इतर सेलिब्रिटींनी आपल्या खास अंदाजात आभार मानले आहेत. लेडी गागाच्या ‘वन वर्ल्ड : टुगेदर एट होम’ या इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी जोडले गेले. प्रियांकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
‘वन वर्ल्ड : टुगेदर एट होम’ या वर्चुअल कॉन्सर्टचं आयोजन डब्ल्यूएचओ आणि ग्लोबल सिटिझन यांनी एकत्र येत शनिवारी केलं होतं. याचं होस्टिंग जिमी फेलोन, जिमी किमेल आणि स्टीफन कोलबर्ट यांनी केलं होतं. या कार्यक्रमामध्ये टेलर स्विफ्ट, एल्टन जॉन, सेलिन डायोन, जेनिफर लोपेज, मडोना, द रोलिंग स्टोन्स, स्टीव वंडर आणि पॉल मेकार्टनी हेदेखील सहभागी झाले होते. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.