कोलकता – मागील शनिवारपासून देशभर दुर्गापूजा अर्थात नवरात्रीची धूम सुरु आहे. पश्चिम बंगालसाठी सर्वात मोठा सण म्हणून दुर्गापूजेला मान आहे, जसा महाराष्ट्रात गेणेशोत्सवाला. कोव्हिड्19 अर्थात करोनाव्हायरसच्या साथीच्या फैलावामुळे सर्वच सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा आली असली तरी मूर्ती घडवणारे कलाकार आणि भक्तांच्या उत्साहात कुठेही कमतरता जाणवत नाही. अशातच कोलकतामधील एका मूर्तीकाराने साकारलेली, करोना राक्षसाचे निर्दालन करणारी दुर्गामातेची मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे.
दरवर्षी, पश्चिम बंगालमधील पूजा मंडपांच्या सजावटीच्या संकल्पनेनुसार, दुर्गापूजनाचा उत्सव सर्जनशीलता आणि कलेच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ठरत असतो. त्या पार्श्वभूमीवर कोलकतामधील एका मूर्तीकाराने डॉक्टरच्या वेशातील महिषासुरमर्दिनी साकारली असून महिषासूराच्या डोक्याच्या जागी त्याने करोनाचा विषाणू साकारला आहे. अशा प्रकारे
डॉक्टरांचा पांढराशुभ्र कोट परिधान करून महिषासुर राक्षसाशी लढतानाची कोव्हिड योद्धा डॉक्टर म्हणून दुर्गाचे चित्रण केले आहे.
या दुर्गेच्या एका हातात त्रिशूलाऐवजी एक लस देण्यात आली आहे आणि ती महिषाशूरला मारण्यासाठी या इंजेक्शनचा वापर करते. याच सजावटीत श्री गणेश आणि कार्तिक यांना अनुक्रमे एक पोलिस अधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून दर्शविले गेले आहे तर लक्ष्मी आणि सरस्वती यांना परिचारिका आणि आरोग्यसेवक म्हणून चित्रित केले आहे.
या “कोव्हिड-योद्धा’ दुर्गेच्या प्रतिमा समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात असून विख्यात लेखक आणि कॉंग्रेसचे प्रवक्ते शशी थरूर यांनीही ट्वीटरद्वारे या मूर्तीकाराच्या कल्पकतेला सलाम केला आहे. तर देशभरातून या अनोख्या मूर्तीविषयी सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.