CoronaFight : पुण्यात वडिलांचे अंत्यसंस्कार करून डॉक्टर मुलगा २४ तासांत ‘ऑन ड्युटी’

पुणे – राज्यात करोनाने धुमाकूळ घातला आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना धडपडावं लागत आहे. करोना संसर्गाने कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होत आहेत. राज्यातील करोनाची स्थिती भीषण आहे. मात्र करोना योद्ध्यांना या स्थितीतही आपलं कर्तव्य पार पाडवं लागत आहे. करोनायोद्धे डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र पुण्यातील एका डॉक्टरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरी त्या डॉक्टरांनी दु:ख बाजुला सारून कर्तव्याला प्राधान्य दिल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातील संजीवन रुग्णालयात डॉक्टर असणाऱ्या डॉ.मुकुंद पेनुरकर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याचे आई, वडिल व भाऊ यांना कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिल गमावल्याचे दु:ख असतानाही डॉ. मुकुंद यांनी आपल्या सर्व भावना बाजूला ठेवल्या. वडिलांवर अत्यसंस्कार करुन डॉ. मुकुंद २४ तासाच्या आत पुन्हा त्यांच्या ड्युटीवर रुजू झाले.

डॉक्टर मुकुंद यांचे वडील करोना पॉझिटीव्ह आले होते. त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू होते. मात्र योग्य उपचार मिळावे यासाठी त्यांना पुण्यात आणलं गेलं. मात्र उपचारादरम्यान डॉ. मुकुंद यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉ. मुकुंद यांनी एकट्यानेच वडिलांचे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या बहिणीने वडिलांचे अत्यंदर्शन व्हिडीओ कॉल द्वारे घेतलं. तर त्यांची आई आणि भाऊ नागपूर येथे अतिदक्षता विभागात करोनावर उपचार घेत आहेत. अशा स्थितीतही डॉक्टर मुकुंद २४ तासांत ड्युटीवर हजर झाले. त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.