अनावश्यक औषधे मागवली जातात : मनसे गटनेते मोरे यांचा आरोप
पुणे – ‘करोना उपचारांत रुग्णालयांसोबतच औषध विक्रेत्यांकडूनही रुग्णांची लूट होत आहे. औषध विक्रेत्यांकडून मिळालेल्या बिलांचेही ऑडिट करा,’ अशी मागणी मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोरे यांनी ही माहिती दिली.
“करोनाबाधितांवरील उपचारांसाठी काही मोठ्या रुग्णालयांसोबत करार केले आहेत. यानुसार महापालिकेने पाठवलेल्या बाधितांवर या रुग्णालयांत मोफत उपचार होणार आहेत; परंतु काही रुग्णालये बाधितांच्या नातेवाईकांना गरजेपेक्षा अधिकची औषधे आणायला भाग पाडत आहेत. उपचारांच्या नावाखाली रुग्णालये आणि त्यांच्या आवारातील औषध विक्रेते संगनमताने रुग्णांना लुबाडत असून, महापालिकेने अवास्तव बिल आकारणाऱ्या रुग्णालयांबरोबरच तेथे आवारात असलेल्या औषध विक्रेत्यांकडील बिलांचीही तपासणी करावी,’ अशीही मोरे यांची मागणी आहे. “शहरातील नामांकित दोन रुग्णालयांमध्ये असा प्रकार घडत आहे.
या रुग्णालयांमधील मेडिकल ऑपरेटरकडून औषधांची चिठ्ठी रुग्णाच्या नातेवाईकांना व्हॉट्सऍपवरून पाठवली जाते आणि पैसे ऑनलाइन स्वीकारले जातात. प्रत्यक्षात रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा दुप्पट औषधे मागवली जातात. एका रुग्णाबाबत शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या औषध विक्रेत्यांबाबत हे घडले असून, ती बाब निदर्शनाला आणून दिल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. असाच प्रकार वडगाव परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये घडत आहे. याबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, असे मोरे म्हणाले.
करोना उपचारासाठी अधिकचे बिल आकारणाऱ्या रुग्णालयांतील बिलांचे ऑडिट तपासण्यासाठी प्रशासनाने समिती नेमली आहे. या समितीने केवळ बिलांचे ऑडिट न करता रुग्णांना दिलेली औषधे आणि बिलांचे ऑडिटही करावे. काही औषध विक्रेत्यांची अनेक रुग्णालयांत मेडिकल स्टोअर्सची साखळी आहे. या सर्व मेडिकल्सचेही ऑडिट करून संबधितांवर कारवाई करावी.
– वसंत मोरे, गटनेते, मनसे