नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) खासगी लॅबमध्ये कोरोना विषाणू Covid-19 चाचणी संदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीतील दर निश्चितीनुसार खासगी लॅबमध्ये Covid-19 चाचणीची तपासणीसाठी जास्तीत जास्त ४ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. संशयिताच्या स्क्रीनिंगसाठी १ हजार ५०० रुपये तर निदानाची पुष्टी करणाऱ्या रिपोर्टसाठी ३ हजार रुपये मोजावे लागतील.
अनुदान किंवा नि:शुल्क तपासणी करावी अशी विनंतीही आयसीएमआरने खासगी लॅबला केली आहे. आयसीएआर द्वारे Covid-19 च्या उपचारासाठी अधिकृत डॉक्टरांच्या सल्लानुसारच खासगी लॅबमध्ये तपासणी करता येणार आहे.
देशभरात कोरोना विषाणूने कहर माजवला आहे. सध्या ICMR कडे एक लाख टेस्टिंग किट आहेत. दहा लाख किटची ऑर्डर देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण सहा ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, याची तपासणी करण्याची सोय उपलब्ध आहे. मर्यादित लॅबमध्ये तपासणी होत असल्यामुळे सध्याच्या घडीला परदेशातून परतलेल्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत होती. खासगी लॅबला परवानगी मिळाल्यामुळे आता तपासणीची व्याप्ती वाढणार आहे.