…म्हणून करोनाने पुन्हा डोके वर काढले! तज्ज्ञांनी सांगितली ‘नेमकी’ कारणे

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 61 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर 879 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 18 ऑक्‍टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 36 लाख 89 हजार 453 वर पोहोचली आहे.

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास करोना आटोक्‍यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात देशभरात अचानक रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे यामागे नेमके काय कारण असावे अशा चर्चा सुरू असून त्यावर आता काही तज्ञांनी भाष्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार

गेल्या काही काळात जगभरात अनेक ठिकाणी या विषाणूने नवे रूप धारण केले आहे. ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि न्यूयॉर्कमध्ये आढळलेले कोरोना व्हेरिएंट चिंतेचे कारण आहे. मार्च महिन्यापर्यंत भारतामध्येही कोरोनाचा डबल म्यूटेंट आढळून आला. महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमधील नागरिकांमध्ये हा नवा विषाणू आढळून आला. करोनाचे हे नवे विषाणू अधिक संसर्गजन्य असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.

रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथील केले. त्यानंतर नागरिक पुन्हा एकदा राजरोसपणे फिरु लागले होते. सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिक सॅनिटायझरचा वापर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम पूर्णपणे विसरुन गेले. अशातच करोनाचे नवे विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली.तरीही आतापर्यंत देशातील एकूण लोकसंख्येपैकी अवघ्या 7 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी पाच टक्के लोकांनी आता कुठे लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे लस उपलब्ध होऊनही करोनाच्या प्रादुर्भावाला हवा तसा आळा घालता आला नाही.

तज्ज्ञांच्या मतानुसार यापूर्वी करोनाची लागण झालेल्या 20 ते 30 टक्के लोकांमधील अँटीबॉडीज आता नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे एकदा करोना होऊन गेलेल्या लोकांनाही पुन्हा करोनाची बाधा व्हायचे प्रमाण वाढले आहे. आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांच्या मतानुसार, एप्रिलच्या मध्यात भारतातील करोना प्रादुर्भाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.