आठ प्रवाशी रुग्णालयात दाखल
मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये 18 प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत. यातील आठ प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चीन आणि विशेष करुन वुआन प्रांतातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. 1 जानेवारी पासूनच्या प्रवाशांची यादी विमातळ प्राधीकरणाकडून घेण्यात येत असून त्यातील महाराष्ट्राचे रहिवाशी असलेल्या प्रवाशांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येत आहे.
त्यांना सर्दी, ताप वा तत्सम लक्षणे आढळली आहेत का? किंवा कुटुंबातील सदस्यांना जाणवत आहे का याबाबत विचारणा केली जात आहे. महापालिका क्षेत्रातील अशा प्रवाशांशी महापालिकेचे आरोग्य अधिकारी संपर्क साधतील तर ग्रामीण भागातील प्रवाशांना आरोग्य विभागाचे अधिकारी दूरध्वनीवरुन संपर्क साधतील.
मुंबईसह राज्याला करोनाचा धोका नको म्हणून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन आणि विशेष करुन वुआन प्रांतातून आलेल्या प्रवाशांची स्क्रिनिंग केली जात आहे. आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. यामध्ये 18 प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत.
त्यामध्ये मुंबईतील 5 प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयात, पुण्यातील नायडू रुग्णालयात 2 प्रवाशांना तर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका प्रवाशास भरती करण्यात आले आहे. यापैकी मुंबईतील 3 प्रवाशांचे प्रयोगशालेय नमुने निगेटिव्ह आल्याचे पुणे येथील एनआयव्ही यांनी कळविले आहे. या सर्व प्रवाशांचे नमुने एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात आले असून उर्वरित प्रवाशांचे प्रयोगशाळा निदान उद्यापर्यंत प्राप्त होईल. मात्र राज्यात एकही पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.